जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ भारतात?

| चेन्नई | वृत्तसंस्था |

जागतिक बुद्धिबळ विश्वात इतिहास घडवणारा भारताचा डी. गुकेश आणि विद्यमान विश्वविजेता चीनचा डिंग लिरेन यांच्यात होणारी यंदाची जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा भारतात खेळवण्यासाठी भारतीय बुद्धिबळ संघटना सर्व शक्यता पडताळत आहेत.

भारतीय बुद्धिबळ क्षितिजावरचा नवा तारा असलेल्या गुकेशसाठी आम्ही मोठी बक्षीस रक्कम देणार आहोत, अशी घोषणा भारतीय बुद्धिबळ संघटनेटचे अध्यक्ष नितीन नारंग यांनी केली. कॅनडात सोमवारी पार पडलेल्या आव्हानवीरांच्या स्पर्धेत 17 वर्षीय गुकेशने विजेतेपद मिळवून बुद्धिबळ विश्वाला थक्क केले.

आम्ही सर्व परिस्थिती आणि शक्यतांचा अभ्यास करत आहोत, येत्या काही दिवसांत त्याबाबत स्पष्टता येईल. संधी मिळाली तर आम्ही निश्चितच जागतिक अजिंक्यपदाची लढत भारतात खेळण्यासाठी प्रयत्न करू, मात्र त्यासाठी प्रायोजक आणि सरकार यांचे सहकार्य महत्त्वाचे असेल, असे नारंग यांनी सांगितले. बुद्धिबळ क्षेत्रातील ही सर्वात प्रतिष्ठेची लढत आयोजित करण्यासाठी भारताने यजमानपदाच्या शर्यतीत उडी मारली तर अनेक प्रायोजक तयार आहेत, असे वृत्त आहे; परंतु त्या संदर्भात अधिक बोलण्यास नारंग यांनी नकार दिला.

Exit mobile version