भारत-ऑस्ट्रेलियामध्ये विश्वचषक महायुद्ध

दक्षिण आफ्रिकेचे स्वप्न भंगले, कांगारूंचा तीन गडी राखून रोमहर्षक विजय
| कोलकाता | वृत्तसंस्था |
दक्षिण आफ्रिकेचे पुन्हा एकदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले असून ऑस्ट्रेलिया सातव्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहचला आहे. कोलकाता येथील ऐतिहासिक स्टेडियम ईडन गार्डन्सवर कांगारूंनी दक्षिण आफ्रिकेवर तीन गडी राखून दणदणीत विजय मिळवला. डेव्हिड मिलरचे झुंजार शतक व्यर्थ ठरले. दक्षिण आफ्रिका पुन्हा एकदा चोकर्सचा शिक्का पुसण्यात अपयशी ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी कांगारुंवर या 213 धावा करण्यासाठी दबाव आणला होता. ऑस्ट्रेलियाची हे लक्ष्य गाठताना खूप दमछाक झाली. ऑस्ट्रेलिया 8व्यांदा फायनलमध्ये पोहचली आहे. याआधी ते 1975, 1987, 1996, 1999, 2003, 2007 आणि 2015 साली अंतिम फेरीत पोहचले होते.

पाचवेळा विश्वविजेता कांगारू संघ रविवारी अहमदाबादच्या मैदानावर यजमान आणि दोन वेळचा विश्वविजेता भारताशी भिडणार आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 49.4 षटकांत सर्व गडी गमावून 212 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 47.2 षटकांत 7 गडी गमावून लक्ष्य गाठले. आफ्रिकन संघ पराभूत होऊन पाचव्यांदा विश्वचषकातून बाहेर पडला आहे. या सामन्यात ट्रॅव्हिस हेडला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. दुसरीकडे, यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकने निवृत्ती घेतली असून त्याचा हा शेवटचा सामना ठरला.

दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हिड मिलरने सर्वाधिक 101 धावा केल्या. क्लासेनने 47 धावांची खेळी केली. कोएत्झीने 19 धावा केल्या. मार्कराम आणि रबाडाने प्रत्येकी 10 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सने प्रत्येकी तीन गडी बाद केले. जोश हेझलवूड आणि ट्रॅव्हिस हेडने प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक 62 धावा केल्या. स्टीव्ह स्मिथने 30 आणि डेव्हिड वॉर्नरने 29 धावांचे योगदान दिले. जोश इंग्लिसने 28 धावा केल्या. लाबुशेनने 18 धावांचे योगदान दिले. अखेरीस मिचेल स्टार्कने 16 धावांची नाबाद खेळी तर पॅट कमिन्सने 14 धावांची नाबाद खेळी करत आपल्या संघाला विजयापर्यंत नेले. दक्षिण आफ्रिकेकडून गेराल्ड कोएत्झी आणि तबरेझ शम्सी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले . कागिसो रबाडा, एडन मार्कराम आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी एक गडी बाद करीत त्यांना मदत केली.

तत्पूर्वी, या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, त्याचा हा निर्णय त्याच्याच संघातील फलंदाजांनी चुकीचा ठरवला. कर्णधार बावुमा पहिल्याच षटकात खातेही न उघडता बाद झाला. मिचेल स्टार्क व जोश हेजलवूड या जोडीने दक्षिण आफ्रिकेवर दबाव टाकत धावा काढू दिल्या नाहीत. त्यामुळे डी कॉकने दबाव कमी करण्यासाठी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यात तो केवळ तीन धावा करून तंबूत परतला.

त्यानंतर मार्करम व रॅसी व्हॅन डर डुसेन यांनी थोडाफार संघर्ष केला मात्र, ते देखील बाद झाले. 4 बाद 24 अशी खराब अवस्था असताना मिलर व क्लासेन या जोडीने संघाचा डाव सावरला आणि 95 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. क्लासेन 47 धावा करून बाद झाला, त्याचे अर्धशतक हुकले. त्याला व जेन्सनला हेडने लागोपाठच्या चेंडूवर बाद केले. त्यानंतर मिलरने डावाची सूत्रे हाती घेताना आक्रमक फटकेबाजी केली. त्याने आपल्या विश्वचषक कारकीर्दीतील पहिले शतक झळकावले. तो 48व्या षटकात बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव 212 धावांवर आटोपला. डेव्हिड मिलरने दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांना सांगितले की, अशा परिस्थितीत कशी फलंदाजी करायची असते. एका बाजूने फलंदाज बाद होत असताना मिलरने शानदार शतकी खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येनजीक नेले होते. मात्र, त्याच्या या खेळीवर दक्षिण आफ्रिकेच्या पराभवामुळे पाणी फेरले गेले.

Exit mobile version