जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा

आक्षेपानंतर भारतीय खेळाडूंना रौप्य व ब्राँझ

| कोबे | वृत्तसंस्था |

जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत एफ 46 गटातील भालाफेकीत आवश्यक असलेली शारीरिक पात्रता नसल्याने श्रीलंकेच्या रौप्यपदक विजेत्या खेळाडूला अपात्र ठरविण्यात आले. त्यानंतर भारतीय खेळाडूंना रौप्य व ब्राँझपदक बहाल करण्यात आले. रौप्यपदक जिंकणाऱ्या दिनेश हेराथच्या शारीरिक क्षमतेबाबत भारतीय संघ व्यवस्थापनाने आक्षेप घेतला होता. हा आक्षेप मान्य करण्यात आल्यानंतर सुधारित निकाल जाहीर करण्यात आला.

पुरुषांच्या एफ 46 गटातील भालाफेकीत भारताच्या रिंकू हुडा आणि अजित सिंग यांनी अनुक्रमे तिसरे व चौथे स्थान मिळविले होते. मात्र, हेराथची शारीरिक क्षमता नियमानुसार नसल्याने भारताने आक्षेप घेतला. त्यामुळे हा निकाल राखून ठेवण्यात आला होता. हेराथच्या शारीरिक क्षमतेनुसार त्याचे वर्गीकरण योग्य प्रकारे करण्यात आले नव्हते आणि तो एफ 46 गटात भाग घेण्यास पात्र नव्हता, अशी प्रतिक्रिया भारतीय पॅरालिंपिक समितीच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे हेराथला अपात्र ठरवून रिंकूला रौप्य, तर अजित सिंगला ब्राँझपदकावर बढती देण्यात आली. रिंकूने स्पर्धेत 62.77 मीटर, तर अजितने 62.11 मीटर अंतरावर भाला फेकला होता.

टोकियो ऑलिंपिकमध्येही तो खेळण्यास पात्र नसताना हेराथने सुवर्णपदक जिंकले होते. त्याच्याविरुद्धचा आक्षेप आम्ही जिंकला, असे भारतीय संघाचे प्रशिक्षक सत्यनारायण म्हणाले. या दोन सुधारित पदकांमुळे भारताची पदकांची संख्या 14 झाली आहे. त्यात 5 सुवर्ण, 5 रौप्य, 4 ब्राँझपदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. ही भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होय. गेल्या वर्षी पॅरिसमध्ये भारतीय खेळाडूंनी एकूण 10 पदके जिंकली होती.

Exit mobile version