उंबरखिंडीचा इतिहास होणार जिवंत; सुशोभीकरणासाठी 53 कोटींचा निधी
। नेरळ । प्रतिनिधी ।
खोपोली वाकण फाटा येथील उंबरखिंडीत 1661 मध्ये पराक्रम घडला होता. 363 वर्षापूर्वी अंबानदीच्या या खोर्यात छत्रपती शिवाजी महाराज यांनी गनिमी काव्याने कारतलबखान उझबेग आणि रायबाघन पाटील यांच्यासह आलेल्या मुघल सैन्याला कोणत्याही मराठा सैनिकाचा बळी न जाता विजय मिळविला होता. याच ऐतिहासिक विजय मिळवलेल्या उंबर खिंडीत महाराष्ट्र सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा धनुर्धारी पुतळा उभा करणार आहे. दरम्यान, या परिसराचा विकास साधण्यासाठी शासनाकडून तब्बल 53 कोटींची तरतूददेखील करण्यात आली आहे.
आजपासून 363 वर्षांपूर्वी म्हणजेच 2 फेब्रुवारी 1661 साली या उंबर खिंडीचे ठिकाण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाले होते. अंबानदीच्या खोर्यात आणि सह्याद्रीच्या घेर्यात सर्व मावळ्यांच्या साथीमुळे महाराजांनी गनिमी काव्याने कारतलबखान उझबेग व रायबाघन पाटील आणि त्यांच्या समवेत असलेल्या मुघल सैन्याला अक्षरशः लोळवले होते. कारतलबखान उझबेग हा नोकरीनिमित्त जरी मुघलशाहीत सरदारकी करत असला तरी तो आजच्या उझबेकीस्तानातला होता. तर, रायबाघन पाटील ही स्त्री माहूरची होती. जिथे आजच्या साडेतीन शक्ती पीठातील रेणुका माता आहे. त्यांचे खरे नाव सावित्रीबाई उदाराम देशमुख असे आहे. रायबाघन यांचा पती औरंगजेबाच्या सैन्यात त्याची सेवा करताना मरण पावला होता. यामुळे पतीच्या जागी रायबागन रुजू झाल्या आणि पराक्रमाच्या जोरावर पातशाहाची वाघीण म्हणजेच रायबाघन अशी पदवी मिळाली होती.
हे दोघे पेण व नागोठणे असे किनारपट्टीवर वसलेल्या बंदरांना लुटून जाळण्यासाठी तब्बल तीस हजाराची फौज घेऊन निघाले होते. लालमहालातून निघाल्यावर सह्याद्रीतील खडतर मार्गाने कुरवंड्या घाटातून ते कोकणातील तुंगारण्यात आले. खरंतर ते वाघासारख्या दबा धरून बसलेल्या मराठ्यांच्या पंजाखाली आले होते. तिथेच त्यांची कोंडी झाली. एक हजार मावळ्यांच्या साथीने महाराजांच्या आदेशाने सरसेनापती नेतोजी पालकरांनी इथे आधीच छावणी टाकली होती. जिथे आज ‘चावणी’ गाव वसले आहे. एका बाजूने स्वतः छत्रपती शिवाजी महाराज तसेच मागच्या बाजूला महारुद्रासारखा उभा असलेला सह्याद्री आणि त्यातून वाट काढत खळखळणारी अंबानदी अशा चारही बाजूंच्या चिमटीत हे दोन सरदार आले आणि घमासान लढाई जुंपली होती. यावेळी एकही मावळा न गमावता ही लढाई मराठ्यांनी जिंकली आणि कोकण वाचले.
अंबानदीने तो राजांचा पराक्रम पाहिलेला आहे. आजही इथली मातीला अंगारा समजला जातो. कारण राजांच्या पदस्पर्शाने ती पावन झालेली आहे. याच विचाराने प्रेरित होऊन राज्य सरकार ऐतिहासिक उंबरखिंड परिसराचे सुशोभीकरण करणार आहे.
जगातील पहिला धनुर्धारी पुतळा
महाराष्ट्र शासनाच्यावतीने विकास साधताना उंबर खिंडीत जगातील पहिला धनुर्धारी राजांचा पुतळा उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल 53 कोटींची तरतूद राज्य सरकारने केली असून या प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात 25 कोटींची निधीला मंजुरी मिळाली आहे. तसेच, साऊंड लाईट तसेच गार्डनची व्यवस्था या प्रकल्पात असणार आहे.






