चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते बैलगाडीचे पूजन

। अलिबाग । वार्ताहर ।
तब्बल 7 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर महाराष्ट्रात बैलगाडी शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली. शेतकरी संघटनेचे नेते, 40 आमदार यांच्या लढ्याला अखेर यश आले. याच यशाचा जल्लोष करीत त्याचा आनंद साजरा करण्यासाठी शुक्रवार 17 डिसेंबर रोजी शेतकरी भवन, अलिबाग येथे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने बैलगाडी पूजन सोहळा पार पडला. या कार्यक्रमामध्ये शेकाप महिला आघडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते बैलगाडीचे पूजन करण्यात आले. शेतकरी, कामगार, युवा आणि सामान्य माणूस यांच्यासाठी काम करणारा आणि या सगळ्यांच्यामागे कायम खंबीरपणे उभा राहणारा शेतकरी कामगार पक्ष हा फक्त बोलत नाही तर, करून दाखवतो हे शेकापने पुन्हा एकदा त्यांच्या कार्यातून दाखवून दिले. गेल्या 7 वर्षांपासून बैलगाडी शर्यतींबाबत कोणताच ठोस निकाल हाती येत नव्हता. यासाठी सर्व स्तरांवरून प्रयत्न सुरू होते. अखेर महाराष्ट्रात बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळाली. या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत होत असून बैलगाडी मालकांमध्ये उत्साह संचारला आहे. कुठे फटाक्यांच्या आतषबाजीने तर कुठे ढोल-ताशाच्या गजरात सर्जा-राजाच्या पुनरागमनाचे स्वागत होत आहे.

Exit mobile version