आजवरचा ऐतिहासिक उच्चांकी दर
| मुंबई | प्रतिनिधी |
सोन्यानंतर आता चांदीही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. आज चांदीच्या दरानं थेट तीन लाख रुपयांचा टप्पा ओलांडत नवा इतिहास रचला आहे. आजवरचा हा सर्वोच्च विक्रमी दर ठरला असून, बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. ऐन लग्नसराईच्या तोंडावर दागिन्यांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मात्र महागाईचा फटका बसणार आहे. चांदी दरवाढीचे हे चंदेरी वादळ कुठे जाऊन थांबणार हे सांगणे मुश्किल आहे.
जागतिक पातळीवर डॉलरमधील चढ-उतार, मध्यपूर्वेतील तणाव आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढता कल याचा थेट परिणाम चांदीच्या किमतींवर दिसून येतोय. त्यातच सौरऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स आणि औद्योगिक क्षेत्रातील वाढती मागणीही दरवाढीस कारणीभूत ठरत आहे. लग्नसराईचा हंगाम सुरू असतानाच चांदी महागल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला फटका, तर गुंतवणूकदार मात्र आनंदी आहेत.
सोन्यापेक्षाही चांदीतून मोठा परतावा मिळाल्याने, चांदीत 40 टक्क्यांपेक्षा अधिक गुंतवणूक वाढली आहे. एरवी सोन्यापेक्षा चांदीतील गुंतवणूक निम्म्याहून कमी होती. यंदा मात्र, हा आकडा दुप्पट नव्हे, तर तिप्पट झाला आहे. दरवाढीचा विचार केल्यास, चांदीत अवघ्या 11 महिन्यातच 137 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ नोंदविली गेली आहे. तुलनेत सोने 47 टक्क्यांनीच वाढले आहे. आतापर्यंत सोने हे गुंतवणूकीसाठी सर्वात सुरक्षित मानले जात होते. मात्र, त्याची जागा आता चांदीने घेतली आहे. मात्र, असे असले तरी, चांदीत मोठी गुंतवणूक ही धोक्याची ठरू शकते, असे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून चांदीला स्थिर भाव होता. दीड वर्षापासून वाढ होत आहे. जगभरातून चांदीला मागणी वाढली आहे. सौरऊर्जा पॅनलमध्ये चांदीचा वापर, इलेक्ट्रॉनिक गाड्यांमध्ये चांदीचा वापर, आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेली युद्ध या सर्व कारणांमुळे भाव वाढत आहेत. सध्या चोख चांदीमध्ये नागरिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणात करत आहेत.
2025 मध्ये 1.21 लाखांची वाढ
चांदीने दरवाढीचा पकडलेला वेग अजूनही कायम आहे. 1 जानेवारी 2025 रोजी चांदीचा दर प्रतिकिलो 87 हजार 578 रुपये इतकी होता. हा दर 18 डिसेंबर 2025 रोजी प्रतिकिलो 2 लाख 9 हजार 90 रुपयांवर पोहोचला. म्हणजेच वर्षभरात चांदीत सुमारे 1 लाख 21 हजार 512 रुपयांची वाढ झाली आहे. ही वाढ 137.34 टक्के इतकी विक्रमी आहे.
जागतिक स्तरावरील युद्धजन्य स्थिती आणि शेअर बाजारात सातत्याने होणारी घसरण याचादेखील चांदीच्या दरावर परिणाम होत आहे. दोन महिन्यांत दोन लाखांनी चांदीचे दर वाढले आहेत. चांदीचे दर कल्पनेच्या पलीकडे गेलेत, हे खरे असले तरी, खरेदीवर कोणताही परिणाम झालेला नाही. भविष्यातील गुंतवणूक म्हणून ग्राहक चांदी खरेदीकडे पाहात आहेत.
-प्रशांत म्हात्रे,
स्टॉक मॅनेजर, वामन हरी पेठे ज्वेलर्स, अलिबाग





