| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
महिला प्रीमियर लीग 2026 च्या वेळापत्रकाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. महिला प्रीमियर लीग 2026 ची सुरुवात जानेवारी महिन्यात होणार असून, अंतिम सामना फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात खेळवला जाईल. तसेच, या आगामी हंगामासाठी दोन शहरांची निवडही करण्यात आली आहे.
महिला प्रीमियर लीग 2026 चा हंगाम 7 जानेवारीपासून सुरू होणार असून, 3 फेब्रुवारीला अंतिम सामना खेळवला जाणार आहे. तसेच, बीसीसीआयने या सामन्यांसाठी मुंबई आणि बडोदा या ठिकाणांची निवड केली आहे. त्यातील पहिला टप्पा नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये पडणार असून, दुसरा टप्पा बडोद्यातील मैटानात पार पडणार आहे. याआधीचे तीनही हंगाम मार्च महिन्यात सुरू झाले होते. परंतु, यंदाचा हंगाम जानेवारीत खेळवला जाणार आहे. भारतात होणारा पुरूषांच्या आगामी टी-20 विश्वचषकामुळेच हे सामने जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत खेळिवले जाणार आहेत.
बीसीसीआयने अद्याप या प्रकरणाबाबत संघ मालकांशी कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. सध्या अनौपचारिक पातळीवर चर्चा सुरू आहे. महिला प्रीमियर लीगच्या चौथ्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव 27 नोव्हेंबरला नवी दिल्लीत पार पडणार आहे. या कार्यक्रमा दरम्यान अगामी हंगामाच्या वेळापत्रकाची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. सामन्यांसाठी लखनौ, बेंगळुरू, मुंबई आणि बडोदा या ठिकाणांवर चर्चा झाली होती. मात्र, अनेक महिला क्रिकेटपटूंनी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमला पहिली पसंती दिली आहे. त्यामुळे हंगामातील पहिला टप्पा तिथे होऊ शकतो. जर परिस्थिती सध्याच्या स्थितीत राहिली तर अंतिम सामना बडोद्यातील कोटाम्बी स्टेडियमवर खेळवला जाऊ शकतो. बडोदाचा पहिला टप्पा 16 जानेवारी रोजी सुरू होण्याची अपेक्षा आहे. कारण भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना त्याच ठिकाणी पाच दिवस आधी खेळवला जाणार आहे.
महिला प्रीमियर लीगचा पहिला हंगाम 2023 मध्ये खेळला गेला होता. तयात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपीटल्सला हरवून विजेतेपद पटकावले होते. 2024 मध्ये आरसीबीने दिल्लीला पराभूत करत किताब जिंकला होता. तर, 2025 मध्ये पुन्हा एकदा मुंबईने दिल्लीला हरवत विजेतेपद मिळविले होते. त्यामुळे दिल्लीला सलग तीन वेळा अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता आगामी हंगामात कोणत्या दोन संघांमध्ये अंतिम सामना होईल, हे पाहणे खूप महत्त्वाचे असणार आहे.







