| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील आंदोशी येथील ग्रामस्थ मंडळ व श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम शाळा यांच्यावतीने आंदोशीमध्ये कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दसऱ्याच्या निमित्ताने ही स्पर्धा दि.24 रोजी दुपारी दोन वाजता सुरू होणार आहे. यावेळी शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांची उपस्थिती असणार आहे.
स्थानिक मल्लांना हक्काचे व्यासपिठ मिळावे. तरुणांमध्ये कुस्तीबद्दल आवड निर्माण व्हावी यासाठी गेल्या 70 वर्षापासून आंदोशी या ठिकाणी कुस्ती स्पर्धा भरवली जात आहे. ग्रामस्थांनी ही परंपरा आजही कायम ठेवली आहे. मंगळवारी होणाऱ्या कुस्ती स्पर्धेमध्ये स्थानिक मल्लांसह जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून मल्ल कुस्ती खेळण्यासाठी येणार आहे. पाचशेहून अधिक मल्लांचा समावेश असणार आहे. कुस्ती स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. दसऱ्यानिमित्त होणाऱ्या कुस्तीच्या सामन्यांचा आनंद प्रेमींना प्रत्यक्षात अनुभवता येणार आहे.