टोरंटच्या भूसंपादनाला लेखी विरोध

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यात होऊ घातलेल्या टोरंट प्रकल्पासाठी रस्ते तयार करण्यास शासनाने काढलेली अधिसुचनेला स्थानिक लेखी हरकत घेऊन विरोध केला आहे. त्यासाठी कर्जतमधील शेतकरी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले होते. तेथे जिल्हा भूसंपादन अधिकारी यांना शेतकऱ्यांनी रस्त्यासाठी जमिनीची अधिग्रहण करू नये, असे पत्र सादर केले.

पाली तर्फे कोतवाल खलाटीमध्ये प्रस्तावित असलेली टोरंट एनर्जी पॉवर सोल्यूशन लिमिटेड कडे जाण्यासाठी 5.91 किलोमीटर लांबीचा रस्ता बनविला जाणार आहे.तशी अधिसूचना राज्य सरकारने काढली आहे. जिल्हा भूसंपादन अधिकारी यांच्या माध्यमातून काढलेली अधिसूचना यांना 6 महिने पूर्ण झाले असून, 300 हून अधिक शेतकऱ्यांनी आपली जमीन देण्यास विरोध केला आहे. त्याचवेळी स्थानिक पातळीवर रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीची मोजणी सार्वजनिक बांधकाम विभागला करू दिली जात नाही. मात्र, तरीदेखील टोरंट प्रकल्प कंपनी आणि प्रशासनाकडून सातत्याने स्थानिक शेतकरी यांच्यावर दबाव टाकला जात आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रकल्पाकडे जाणारा रस्ता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीमधून जाणार आहे, त्या आंबोट, पाली, पोटल, सायडोंगर येथील शेतकऱ्यांनी अलिबाग येथे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन हरकत घेतली. जिल्हा भूसंपादन अधिकारी श्रीकांत गायकवाड यांची भेट घेत शेतकऱ्यांनी आपल्या मागणीचे निवेदन सादर केले. जमीन संपादनाबाबत या पुढील बैठक दि.6 ऑक्टोबर रोजी होणार असून, सर्व गावातील शेतकरी तेथे पोहचणार आहेत.

Exit mobile version