एमआयडीसीकडून काम थांबविण्याची मागणी
| नागोठणे | प्रतिनिधी |
नागोठण्याजवळील पिगोंडे ग्रामपंचायत हद्दीतील वेलशेत गावच्या हद्दीतील गट क्रमांक 222 राखीव वन क्षेत्रातील जागेवर एमआयडीसीकडून चुकीचे बदल करून सुरू केलेले काम तत्काळ थांबविण्याची मागणी वेलशेत येथील एक जागरूक ग्रामस्थ प्रल्हाद पारंगे यांनी रायगडचे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच या राखीव वन क्षेत्रातील जागेच्या 7/12 उताऱ्यामध्ये चुकीने खासगी नाव नोंद झाल्याने या बदलाची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणीही प्रल्हाद पारंगे यांनी उप वनसंरक्षक, अलिबाग यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
यासंदर्भात पारंगे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मौजे वेलशेत, पो. पिगोंडे, ता. रोहा येथील गट क्रमांक 222 मधील जमीन ही शासनाने भारतीय वन अधिनियम, 1927 नुसार राखीव वन क्षेत्र म्हणून घोषित केली आहे. मात्र, या जमिनीचा 7/12 उतारा हा एमआयडीसीच्या नावावर चुकीने बदल करण्यात आला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच संबंधित ठिकाणी औद्योगिक विकासाचे कामकाज सुरू करण्यात आले आहे. ही बाब शासनाच्या वन जमिनीच्या मालकी हक्कास बाधक असून, या प्रकारामुळे वन संरक्षक अधिनियम, 1980 तसेच महाराष्ट्र वन अधिनियम, 1961 चे यामुळे उल्लंघन होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणी सुरू असलेले एमआयडीसीचे काम तात्काळ थांबविण्याचे आदेश व्हावेत, चुकीचा 7/12 रद्द करून राज्य शासन वन विभाग अशी नोंद पुन:स्थापित करण्यात यावी तसेच या जागे संबंधी चुकीचा बदल कोणी केला याची चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यासंदर्भात वन विभागाचे नागोठणे वन परिक्षेत्र अधिकारी दादासाहेब कुकडे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.







