आजपासून दहावीच्या परीक्षा ; १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी

। पुणे । वृत्तसंस्था ।
महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात येणारी दहावीची परीक्षा आजपासून (१५ मार्च) सुरू झाली आहे. तरी १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली असून, मुख्य केंद्र आणि उपकेंद्र मिळून २१ हजार ३८४ ठिकाणी परीक्षा होणार आहे.
यंदा करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य मंडळाने प्रत्यक्ष परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बारावीची परीक्षा ४ मार्चपासून सुरू झाली आहे, तर आजपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे. विद्यार्थी कोरोना बाधित झाल्याने किंवा अन्य वैद्यकीय, अपरिहार्य कारणांमुळे प्रात्यक्षिक, लेखी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा देऊ न शकल्यास ५ एप्रिल ते २२ एप्रिल या कालावधीत परीक्षा घेतली जाईल. तर पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये घेण्याचे राज्य मंडळाचे नियोजन असल्याचे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी परिपत्रकाद्वारे सांगितले.

Exit mobile version