यशश्री भगत यांची न्यायाधीशपदी निवड
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अॅड. यशश्री नल्लुरी भगत यांची दिवाणी न्यायाधीशपदी निवड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2022मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत त्यांनी घवघवीत यश संपादन करून अलिबागच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या हस्ते यशश्री भगत यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
यशश्री भगत या अलिबागमधील पंतनगर येथील रहिवासी आहेत. आपल्या जिद्दी व मेहनतीच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत यश मिळविले आहे. वकील क्षेत्रात काम करीत असताना त्यांनी न्यायाधीश होण्याचे स्वप्न बघितले होते. हे स्वप्न त्यांनी प्रचंड मेहनतीने प्रत्यक्षात उतरविले आहे.
2022 मध्ये 114 जागा भरण्यासाठी आयोगाकडून जाहीरात प्रसिद्ध झाली होती. साधारणतः 10 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रथम परीक्षा दिली होती. त्यातून 1 हजार 200 विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले होते. त्यात 341 विद्यार्थ्यांची थेट मुलाखतीसाठी निवड झाली. अॅड. यशश्री भगत यांनी यामध्ये घवघवीत यश मिळवून त्यांची दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग म्हणून निवड करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी वरिष्ठ वकील गणेश शिरसाठ यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि आई-वडीलांकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे त्यांनी यश प्राप्त केल्याचे सांगितले आहे.