। पनवेल । वार्ताहर ।
मुक्त शिक्षणासाठी देशातील अग्रगण्य विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणार्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला नॅक अर्थात राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेकडून ‘अ’ श्रेणीचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. देशात 2019 पासून दूरस्थ शिक्षण देणार्या विद्यापीठांच्या नॅक मूल्यांकनाला सुरवात झाली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला नॅककडून पहिल्याच फेरीत ‘अ’ श्रेणीसह मानांकन प्राप्त झाल्याने आनंद व्यक्त होत आहे. याबाबतची अधिकृत घोषणा कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात केली. कार्यक्रमास अंतर्गत गुणवत्ता केंद्राचे प्रमुख डॉ. सूर्या गुंजाळ, अंतर्गत गुणवत्ता केंद्राचे संचालक डॉ. हेमंत राजगुरू उपस्थित होते.
पहिल्या टप्प्याअंतर्गत नविन निकषानुसार विद्यापीठाने स्वयंमूल्यनिर्धारण संख्यात्मक अहवाल सादर केला. या विविध निकषांमध्ये अभ्यासक्रम, अध्ययन-अध्यापन प्रणाली, संशोधन, नवनिर्मिती व विस्तार, पायाभूत सुविधा आणि अध्ययन स्रोत, प्रशासन, नेतृत्व व व्यवस्थापन आणि संस्थात्मक मूल्ये व उत्तम उपक्रमांचा समावेश होतो. दुसर्या गुणात्मक टप्प्यांतर्गत विद्यार्थी समाधान सर्वेक्षण आणि माहितीची विधिग्राहयता व पडताळणीची प्रक्रिया पार पडली. यामध्ये संख्यात्मक माहितीवर आधारित ऑनलाईन प्रक्रिया तर गुणात्मक माहितीसाठी पीआर टीमची प्रत्यक्ष भेट अशा स्वरूपात मूल्यांकन केले गेले. या कालावधीत नॅक सदस्यांनी विद्यापीठाच्या सर्व विभागांना भेटी दिल्या. तसेच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी जी पाटील, कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, अंतर्गत गुणवत्ता केंद्राचे प्रमुख डॉ. सूर्या गुंजाळ, परीक्षा नियंत्रक बी. पी. पाटील, अंतर्गत गुणवत्ता केंद्राचे संचालक डॉ. हेमंत राजगुरू यांच्यासह विविध विद्या शाखांचे संचालक, प्राध्यापक, वित्त व लेखा अधिकारी, संशोधक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. विद्यापीठाची सामाजिक कार्ये, जोपासलेली मूल्ये, विद्यार्थ्यांसाठी सुलभ कार्यप्रणाली विद्यार्थी विकास अशा अनेक बाबतीत विद्यापीठाने संख्यात्मक आणि गुणात्मक अशा निकषांवर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. माजी कुलगुरू प्रा. ई वायूनंदन यांच्या कालावधीत नॅकची तयारी करण्यात आली होती तर विद्यमान कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाने नॅक समितीसमोर सादरीकरण केले