वर्षपूर्तीचे वेड गावां-गावात

वेगवेगळे सांस्कृतिक-सामाजिक उपक्रम

। अलिबाग । प्रतिनिधी ।

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी जल्लोष साजरा करण्याचे वेड पूर्वी शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात होते. परंतु गेल्या दोन वर्षापासून हे वेड गावातदेखील वाढले असल्याचे दिसून आले आहे. 2023 या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी गावागावात वेगवेगळे सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. वर्षपूर्तीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील गावा गावात यंदा मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. गावातील ग्रामस्थ, महिलांनी एकत्र येत गोड पदार्थ तयार करण्याबरोबरच मासांहार तयार करून त्यावर ताव मारला. 2024 वर्ष उगविल्यावर रात्री बारानंतर ध्वनिक्षेपकच्या तालावर नाचत अनेकांनी नव्या वर्षाचे स्वागत केले. काहींनी कोकणातील वैशिष्टयपूर्ण खाद्य पदार्थाचा प्रकार असलेल्या पोपटी खाण्याचा आनंददेखील ग्रामस्थांनी घेतला.

काहींनी मित्रमंडळी, तर काहींनी कुटुंबियांसमवेत वर्षपूर्ती साजरी केली. त्याची तयारी गेल्या पंधरा दिवसांपासून सुरु होती. काही जण गावात, काहींनी गावांतील शेतांमध्ये एकत्र येऊन नव्या वर्षाचा आनंद उत्सव साजरा केला. पूर्वी वर्षपूर्ती साजरी करण्याचे वेड फक्त मोठ्या शहरांपूरता होते. आता मात्र ते वेड गावागावात असल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रत्येकाच्या चेहर्‍यावर एक वेगळा उत्साह दिसून आला होता. काही ठिकाणी रात्री साडेबारा तर काही ठिकाणी दिड वाजेपर्यंत हा उत्सव साजरा करीत सरत्या वर्षाला निरोप दिला. काही ग्रामपंचायतीच्या वतीने गावांमध्ये सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमांमध्ये गावांमध्ये फिरण्यास आलेल्या पर्यटकांसह गावांतील ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता.

कुटूंबिय, व मित्रमंडळींसमवेत गावांमध्ये थर्टी फर्स्ट वर्षपूर्ती साजरी करण्याचा आनंद वेगळा आहे. त्यामध्ये जिव्हाळा दिसून येतो. ती आठवण कायम स्मरणात राहणारी आहे.

कल्पेश ठाकूर – ग्रामस्थ
Exit mobile version