| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत आहे. शनिवारी जिल्ह्यामध्ये एकूण 150 मि.मी. पाऊस पडला असून, सरासरी 9.38 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. हा पाऊस सोमवारी (दि.27) पर्यंत असणार आहे. या कालावधीत रायगड जिल्ह्याला यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
शुक्रवारी सायंकाळपासून पाऊस जोरदार पडत आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. अचानक पडलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. पावसापासून बचाव करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. अलिबाग एसटी बसस्थानकात पाणी साचल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली होती. रात्रीपासून पाऊस सुरुच राहिला. ढगांच्या गडगडासह वादळी पाऊस पडत होता. शनिवारीदेखील दुपारपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले. काही ठिकाणी पावसाची रिपरिप सुरुच होती. शनिवारी जिल्ह्यामध्ये 150 मि.मी. पाऊस पडल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. वारा पावसामुळे समुद्रात गेलेल्या बोटीदेखील माघारी फिरवून किनारी आणण्यात आल्या आहेत. या अवकाळी पावसाचा मासेमारीवरही परिणाम झाला आहे.
पावसावर दृष्टीक्षेप
अलिबाग - 26.00, उरण - 3.00, कर्जत - 2.00, रोहा - 22.00, सुधागड - 49.00, माणगाव - 11.00, तळा - 4.00, महाड - 17.00, पोलादपूर - 9.00, श्रीवर्धन - 2.00, म्हसळा - 5.00 अशा एकूण- 150 मि. मी. पाऊस पडला असून, त्याची सरासरी- 9.38 मि. मी. आहे.
प्रवासी बोटी बंद
मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात सायंकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळे प्रवाशांसह नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. समुद्र खवळण्याचा धोका निर्माण झाल्याने शनिवारी दुपारपासून मांडवा येथील प्रवासी बोटी बंद ठेवण्याच्या सूचना महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने दिल्या. त्यामुळे दुपारपासून जलवाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे.






