रायगडात पुढील पाच दिवस यलो अलर्ट

| पुणे | प्रतिनिधी |
हवामान विभागाने पुढील 5 दिवसात मुंबईसह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच संपूर्ण विदर्भासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्फ देण्यात आला आहे. यामध्ये रायगड जिल्ह्याचाही समावेश आहे.

मुंबईत गेल्या आठवड्यात जोरदार पाऊस पडला होता. यामुळे सखल भागात पाणी साचल्याने रस्ते आणि रेल्वे वाहतूक मंदावली होती. यासह पावसामुळे आजारांमध्येही वाढ झाल्याने मुंबईकर पावसाने थोडीशी उसंत घेण्याची वाट पाहत होते. दरम्यान गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पाऊस गायबच झाला आहे. दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये मंगळवारपर्यंत हलक्या ते मध्यम सरी पडू शकतील. तसंच बुधवारी, गुरुवारी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.

हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील वातावरण कसं असेल यासंबंधी अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात गुरुवारपर्यंत तुरळक पाऊस पडेल. तसंच मुंबईत मंगळवारपर्यंत हलक्या ते मध्यम सरी कोसळतील. बुधवार, गुरुवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यातही मंगळवारपर्यंत मध्यम सरींची शक्यता आहे. बुधवार आणि गुरुवारी येथेही मुसळधार पाऊस हजेरी लावू शकतो. ठाणे जिल्ह्यात मंगळवार ते गुरुवार मुसळधार पावसाची शक्यता आहे.

रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, दुसरीकडे संपूर्ण विदर्भालाच यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांतील नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Exit mobile version