‘आरोही’ वाण ठरतोय आकर्षणाचे केंद्र
| पाली /बेणसे | प्रतिनिधी |
उन्हाळ्याची चाहूल लागताच बाजारात लालचुटूक कलिंगडे दिसू लागतात, मात्र रायगड जिल्ह्यातील घोसाळे किल्ल्याच्या परिसरात यंदा काहीतरी वेगळे पाहायला मिळत आहे. येथील शेतात चक्क ‘आरोही’ नावाचे पिवळा गर असणारे वैशिष्ट्यपूर्ण कलिंगड डोलत असून, पर्यटकांना आणि खवय्यांना हे कलिंगड थेट शेतातून स्वत:च्या हाताने निवडून खुडण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
वरतून इतर कलिंगडांसारखेच हिरवे दिसणारे हे फळ कापल्यानंतर आतून गडद पिवळ्या रंगाचे निघते. दिसायला आकर्षक आणि चवीला अधिक गोड असलेल्या या वाणाची लागवड येथील शेतकरी ऋषिकेश म्हात्रे व प्रवीण म्हात्रे यांनी प्रायोगिक तत्त्वावर यशस्वी केली आहे. केवळ बाजारात मिळणारे फळ विकत न घेता, ग्राहकांनी सहकुटुंब शेतात यावे, फिरण्याचा आनंद घ्यावा आणि हवे ते फळ स्वत: निवडावे, ही संकल्पना येथे राबवली जात आहे. येत्या 17 मार्च ते 27 मार्च दरम्यान ही संधी उपलब्ध असून, 45 रुपये प्रति किलो या दराने हे कलिंगड उपलब्ध होणार आहे.
जिल्ह्यात प्रामुख्याने अलिबाग, पेण आणि रोहा परिसरात मोठ्या प्रमाणात तसेच इतरही ठिकाणी लाल कलिंगडाची लागवड होते. मात्र, स्वत: निवडा आणि तोडा ही संकल्पना आणि ‘आरोही’ (पिवळे कलिंगड) या वाणाची लागवड जिल्ह्यात अत्यंत मर्यादित ठिकाणी किंवा दुर्मिळ आहे. बहुतेक शेतकरी आपला माल घाऊक व्यापाऱ्यांना विकतात. मात्र, थेट ग्राहकांना शेतात बोलावून विक्री केल्यामुळे शेतकऱ्याला चांगला भाव मिळेल. आणि पर्यटनालाही चालना मिळणार आहे. घोसाळे किल्ल्याच्या परिसरात होणारा हा प्रयोग जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांसाठी ‘कृषी-पर्यटना’चा एक नवीन आदर्श ठरू शकतो.
ऋषिकेश म्हात्रे
लोकांना शेतीचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा आणि त्यांना स्वतःच्या हाताने निवडलेले 100% ताजे व दर्जेदार फळ मिळावे, या उद्देशाने आम्ही पिक युअर ओन ही संकल्पना राबवत आहोत. ‘आरोही’ या पिवळ्या कलिंगडाचे वेगळेपण आणि शेतात फिरण्याचा आनंद पर्यकांसाठी नक्कीच नवा अनुभव ठरेल. ग्राहकांच्या प्रतिसादावर या प्रयोगशील शेतीचे यश अवलंबून आहे. जास्तीत जास्त लोकांनी या उपक्रमाला भेट द्यावी.
प्रवीण म्हात्रे
शेतकरी







