योग, सकस आहार आरोग्यसंपन्न जीवनाची गुरुकिल्ली: गौतम लेव्हा

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जे.एस.एम. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग, नेचर क्लब आणि भारत स्वाभिमान न्यास, रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने समग्र योग शिबिराचे गुरुवार, दि. 5 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. दरम्यान, योग प्रशिक्षक गौतम लेव्हा यांनी शिबिरार्थीना मार्गदर्शन करताना सांगितले की, योग आणि सकस आहार हे आरोग्यसंपन्न जीवनाची गुरुकिल्ली आहे. या शिबिरासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

या शिबिरासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड, डॉ. मीनल पाटील, डॉ. सुनील आनंद, मंजुषा पाटील, समृद्धी पाटील तसेच 75 एन.एस.एस. स्वयंसेवक, 60 एन.सी.सी. कॅडेट्स आणि इतर 20 विद्यार्थी असे एकूण 155 विद्यार्थी उपस्थित होते.

गौतम लेव्हा यांनी शिबिरार्थिना मार्गदर्शन केले. आपले जीवन जर निरोगी ठेवायचे असेल तर प्रत्यकाने रोज योगाभ्यास करणे व सकस आहार घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले तसेच पुढे त्यांनी प्राणायामचे विविध प्रकार जसे की, भस्त्रिका, भ्रामरी, अनुलोम विलोम, कपालभाती, ओंकार याचे महत्त्व सांगितले व त्याची प्रात्यक्षिके करून दाखवली. त्यानंतर विविध योगासने व त्यापासून होणारे फायदे गौतम लेव्हा यांनी सांगितले.

प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना योगाभ्यासाचे महत्त्व विशद केले व सर्व विद्यार्थ्यांनी निरोगी जीवनासाठी रोज घरी योगासने व प्राणायाम करावे, असे आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुहास गानू यांनी, तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण गायकवाड यांनी केले.

Exit mobile version