पनवेलची योगिनी पाटील ठरली महाराष्ट्राची सर्वोत्कृष्ट ज्युनियर बॉक्सर

। पनवेल । साहिल रेळेकर ।
26 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीत सांगली येथे झालेल्या 33व्या ज्युनियर महिला महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये बॉक्सर्सच्या रायगड संघाने एक सुवर्ण आणि तीन कांस्यपदकांची कमाई केली आहे. या बॉक्सिंग स्पर्धेत 50 किलो वजनी गटात योगिनी पाटीलने पुणे, परभणी आणि जळगाव येथील प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे तिला चॅम्पियनशिपमधील सर्वोत्कृष्ट बॉक्सर म्हणून गौरवण्यात आले. तर मधुरा पाटील, उन्नती परदेशी आणि भाग्यश्री साळुंखे यांनी वजन गटात कांस्यपदक मिळवले.

या स्पर्धेत योगिनी पाटील हिला 48-50 वजन गटात सुवर्णपदक मिळाले असून उत्कृष्ट बॉक्सर म्हणून तीचा सन्मान करण्यात आला. तसेच मधुरा पाटील हिला 52-54 वजनगटात कास्य पदक मिळाले. 54-57 वजन गटात उन्नती परदेशी हीने कास्य पदक पटकावले. तर भाग्यश्री साळुंखे हिला 57-60 वजन गटात कास्य पदक मिळाले. विशेष म्हणजे बॉक्सर्स योगिनी पाटील आणि उन्नती परदेशी या दोघींचे कौशल्य आणि राज्य चॅम्पियनशिपमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल रोहतक, हरियाणा येथील राष्ट्रीय निवड चाचणी साठी महाराष्ट्राच्या टीम मधून निवड करण्यात आली आहे.

स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केलेल्या पनवेलमधील बॉक्सर्स स्पर्धकांना पनवेलचे कोच अद्वैत शीमवणेकर तसेच पुण्यातील कोच तथा माजी ऑलिम्पियन मनोज पिंगळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. पनवेलमधील या बॉक्सर्सने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, तसेच पुढील स्पर्धांसाठी भरभरून शुभेच्छाही दिल्या जात आहेत. बॉक्सर्स योगिनी पाटील आणि उन्नती परदेशी या दोघी स्पर्धकांची निवड चाचणीसाठी महाराष्ट्र टीम संघात निवड झाल्याने पनवेलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Exit mobile version