तु ही रे माझा मितवा…

तुळपुळे दाम्पत्याची अजब प्रेमकहाणी
। सायली पाटील । अलिबाग ।
आमच्या प्रेमविवाहाला 44 वर्षे पूर्ण झाली. या चार दशकांच्या वाटचालीत प्रेमात तसूभरही फरक पडला नाही. अनेक संकटांवर मात करीत आनंदाचे क्षण गोड करीत अजूनही आमच्या प्रेमाचा गोडवा कायम टिकला आहे. अशी प्रेमपूर्वक कबुली अलिबागमधील ज्येष्ठ विधिज्ञ निला तुळपुळे यांनी दिली. ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या निमित्ताने त्यांच्या ‘लव्हस्टोरी’विषयी त्यांना बोलते केले असता, त्यांनी आपल्या सहजीवन प्रवासाचा उलगडा केला.

25 जून 1975 ला देशात लागलेली आणीबाणी आणि त्याच आणीबाणीतून सुरू झालेली तुळपुळे दाम्पत्याची ही प्रेमकहाणी. हीच आणीबाणी मोडून काढण्यासाठी अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी सत्याग्रह केले. त्याचदरम्यान, अलिबाग येथील विद्यार्थ्यांनी केलेल्या सत्याग्रहात निला तुळपुळे व गिरीश तुरपुळे हे दोघेही सहभागी होते. महत्त्वाचे म्हणजे, गिरीश तुळपुळे या सत्याग्रहाचे नेतृत्व करीत होते. त्यामुळे निला तुळपुळे या अंगी नेतृत्वगुण असणार्‍या गिरीश यांच्या प्रेमात पडल्या. सत्याग्रह केला आणि तिथेच या दोघांची पहिली भेट झाली. आणि त्यानंतर विचार जुळले, परिचय वाढला, प्रेमाचा संवाद सुरू झाला आणि हे प्रेमाचं रोपटं हळूहळू बहरू लागलं. 1975 साली सुरू झालेल्या या प्रेमकहाणीचे रुपांतर 24 नोव्हेंबर 1978 ला विवाहबंधनात झाले.

प्रत्येक प्रेमकहाणीत अडथळे, नकार, संकटं ही अटळ आहेत. पण, या सगळ्यावर मात करत, आपल्या प्रेमावर निखळ विश्‍वास ठेवत जे आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याच्या निर्णयावर ठाम असतात, त्यांच्या प्रेमाला कोणतेच अडथळे, संकटं पराभूत करु शकत नाहीत. अगदी असेच निला तुळपुळे यांच्या कुटुंबाकडून त्यांच्या या प्रेमाला साफ नकार होता. पण, म्हणतात ना-
ये इश्क नही आसान, मुश्कील इसे पाना है।
एक आग का दरिया है, और डुबके जाना है।

मग काय? या दाम्पत्याने पळून जाऊन लग्न केले. पण, लग्नाच्या 3-4 वर्षांनंतर दोन्ही कुटुंब एकत्र आले. आणि, 44 वर्षांनंतरही त्यांच्या प्रेमाचा गोडवा आजही कायम टिकून आहे. प्रेम केल्यावर घरच्यांचा विरोध असताना फक्त पळून जाऊन लग्न करणं, हे काही शौर्याचं काम नसतं, तर ते नातं आयुष्यभर तसंच निभावणं, हे महत्त्वाचं असतं, याचा आदर्श वस्तुपाठच तुळपुळे दाम्पत्याने तरुणापुढे ठेवला आहे.

हल्लीच्या प्रेम करणार्‍यांमध्ये प्रेमात असताना जग फार सुंदर वाटतं, पण वास्तविकतेत संसार सुरू झाल्यानंतर विचार जुळत नाहीत, परिपक्वता नसते, विश्‍वासाचे धागे घट्ट नसतात. त्यामुळे बहुधा संसार टिकत नाहीत. – अ‍ॅड. निला तुळपुळे

Exit mobile version