| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत यंदा केवळ राजकीय पक्षांची ताकदच नव्हे, तर उमेदवारांचे वय, शिक्षण आणि अनुभव यांचाही कस लागणार आहे. 20 प्रभागांतील 78 जागांपैकी सात जागांवर बिनविरोधाचा निकाल निश्चित होत असताना उर्वरित 71 जागांसाठी रंगणाऱ्या लढतींमध्ये उमेदवारांच्या शपथपत्रांतून समोर आलेली शैक्षणिक पात्रता आणि वयोमानाची विविधता लक्षवेधी ठरत आहे.
यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांनी शिक्षणाला अधिक महत्व दिले. अनेक प्रभागांमध्ये बीई, बीटेक, एमबीए, एलएलबी, बीएसस्सी, आर्किटेक्चर अशा उच्चशिक्षित तरुण-तरुणींना संधी देण्यात आली आहे. 21 ते 30 वयोगटातील उमेदवार मोठ्या संख्येने रिंगणात उतरले असून, ही पिढी थेट अनुभवी माजी नगरसेवकांशी दोन हात करत असल्याने लढाईत वेगळे परिमाण मिळाले आहे. दुसरीकडे, 50 ते 70 वयोगटातील ज्येष्ठ उमेदवारांचा अनुभवही दुर्लक्षित झालेला नाही. काही प्रभागांमध्ये पदवीधर, वकील, निवृत्त अधिकारी अशा अनुभवी उमेदवारांना मतदारांसमोर पर्याय म्हणून उभे करण्यात आले आहे. यामध्ये शिक्षणाच्या पातळीत मात्र मोठी तफावत दिसून येते. काही ठिकाणी दहावी-नववीपर्यंत शिक्षण घेतलेले उमेदवार तर समोरच्या बाजूला अभियंते, डॉक्टर, व्यवस्थापन पदवीधर अशी तुलना मतदारांना करावी लागणार आहे. पनवेल महापालिकेची ही निवडणूक तरुणवर्ग विरुद्ध अनुभव, उच्चशिक्षण ते पारंपरिक राजकारण आणि नवे चेहरे विरुद्ध जुने नेतृत्व अशा अनेक पातळ्यांवर रंगतदार ठरण्याची शक्यता आहे.







