। ठाणे । प्रतिनिधी ।
डोंबिवली पूर्वेकडील गोग्रासवाडी, जिजाईनगर परिसरात एका सात वर्षीय चिमुकल्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. कृष्णा संजय यादव असे मृत मुलाचे नाव आहे. रविवारी सकाळी कृष्णा इमारतीच्या पाठीमागील मोकळ्या जागेत आपल्या मित्रांसोबत बॉल खेळत होता. खेळता खेळता कृष्णाचा बॉल यमुना अर्जुन सोसायटीसमोरील कोपऱ्यावर असलेल्या महावितरणच्या इलेक्ट्रिक फिडर पिलरजवळ गेला. बॉल काढण्यासाठी गेलेल्या कृष्णाचा हात नकळत फिडर पिलरला लागला. विजेचा प्रवाह इतका तीव्र होता की कृष्णा तिथेच पिलरला चिकटून बेशुद्ध पडला. त्याला पिलरला चिकटलेले पाहून परिसरातील रहिवाशांनी तातडीने धाव घेत त्याला बाजूला केले. त्याला तातडीने स्टार कॉलनीतील एसीई हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याबाबत टिळकनगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेमुळे परिसरातील उघड्या विजेच्या खांबांबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.





