झोपेत चालताना तरुण सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला

| मुंबई | प्रतिनिधी |

झोपेत चालताना सहाव्या मजल्यावरुन पडून मुंबईत एका 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना भायखळा परिसरात घडली आहे. मुस्तफा इब्राहिम चुनावाला असे या मृत तरुणाचे नाव आहे. सहाव्या मजल्यावरुन पडल्यानंतर मुस्तफा गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला सेफी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता.

अनेकांना झोपेत चालण्याची सवय असते असे आपण यापूर्वीही ऐकले आहे. पण, याच झोपेत चालण्याच्या सवयीमुळे एका 19 वर्षांच्या तरुणाचा नाहक बळी गेल्याची घटना भायखळा पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे. माझगाव येथे राहणाऱ्या चुनावाला कुटुंबातील 19 वर्षांच्या मुलाचा इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन कोसळून मृत्यू झाला आहे. चुनावाला कुटुंबीय हे टॉवर नंबर 1, नेसबीट रोड, माझगाव येथे राहातं. चुनावाला यांच्या मुलाला झोपेत चालण्याची सवय होती. 30 जूनच्या मध्यरात्री मुस्तफा हा झोपेत चालत असताना सहाव्या माळ्यावरून खाली कोसळला. तो तिसऱ्या मजल्यावरील पोडियम स्पेसमध्ये पडला. यात मुस्तफा गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचरासाठी सेफी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी मुस्तफाला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी भायखळा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version