धोकवड्यात तरुणीला 20 जणांची जबर मारहाण; सात दिवसानंतरही आरोपी मोकाट

रशीने गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न
अलिबागकरांचा जिल्हा प्रशासनाकडे कारवाईची मागणी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
धोकवडे-गायचोळे येथे जमिन विकसीत करण्याचे काम करणार्‍या तरुणीसह तिच्या सहकार्‍याला 20 जणांच्या जमावाने लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. यावेळी आरोपींच्या सोबत असणार्‍या सात महिलांनी मिळून मारहाण करत एकीने नॉयलॉनच्या दोरीने गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत मांडवा सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर फक्त पाचच आरोपीना पोलिसांनी अटक केली. तर इतर आरोपी अजूनही मोकाट असल्याने सदर जखमी तरुण-तरुणी असुरक्षिततेच्या छायेत आहेत. याप्रकरणी सदर तरुणीची आई सपना वारगे यांच्यासह मी अलिबागकर गु्रपच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ पद्मश्री बैनाडे यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. त्यावर जिल्हाधिकार्‍यांनी पोलिस अधिक्षक अशोक दुधे यांच्या संपर्क साधत याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले.
शेकापक्षाचे पुरोगामी युवक संघटनेचे तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे, अशोक वारगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रशासनाची भेट घेत कारवाई करण्याबाबतची मागणी केली. या निवेदनानुसार सदर घटनेमुळे संपुर्ण राज्यामध्ये महिलांवर होणार्‍या आत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. महिलांवरील अत्याचार संदर्भातील गुन्हे कमी होत नाही. रायगड जिल्हा देखील या गोष्टीत मागे राहीलेला नाही हेच या घटनेवरुन स्पष्ट झाले आहे. दिनांक 30 सप्टेेंबर 2021 रोजी अलिबाग येथील राहाणारी तरुणी (24) ही आपला सहकारी उत्कर्ष उदय राऊळ याच्यासह धोकवडे-गायचोळे येथे विद्युत प्रवाहाकरीता डी.पी. बसवीण्याचे कामाकरीता कामगारांना मार्फत काम करीत असताना असताना तेथेच राहणारे दिलीप किसन म्हाळुगे, राजेश किसन म्हाळुगे व इतर 15 ते 16 स्त्री पुरुष यांनी जुन्या वादावरून दोघांना अमानुषपणे मारहाण करून, वायर कट करण्याचा कंडक्टर डोक्यात मारून ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्या मुलीला लोखंडी रॉडने मारहाण करीत तिच्या गळयामध्ये रस्सी अडकवुन तीचा गळा आवळुन तीला ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्याबाबत मांडवा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 326, 143, 147, 148, 149, 327, 341, 427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणातील 5 जणांना अटक करण्यात आले असले तरी मारहाण करणारे 15 ते 16 जण मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने मोकाट फिरत आहेत. त्यामुळे अलिबागकर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. अशा प्रकारे जर लोक गुन्हा करून मोकाट व बिनधास्त फिरत राहीले तर महिलांवर होणार्‍या अत्याचारास प्रतिबंध कसा होईल असा सवाल अलिबागकर नागरिकांनी केला आहे. महिलांवरील गुन्हे कमी करायचे असतील तर सर्वच्या सर्व जे या कृत्यास जबाबदार आहेत त्यांचेवर कारवाई झालीच पाहीजे. पुन्हा लोकांची अशा प्रकारचे कृत्य करण्याची हिंमत नाही झाली पाहीजे. अशी मागणी मुलीच्या आईने प्रशासनाकडे केली आहे.

एका तरुणीला 20 जणांचा जमाव बेदम मारहाण करुन तिचा जिव घेण्याचा प्रयत्न करतो आणि तरी देखील पोलिस सर्व आरोपींना अटक करीत नसतील तर महिला कशा सुरक्षित राहतील? या घटनेतील सर्वच्या सर्व आरोपींना ताबडतोब अटक करुन तात्काळ कठोर कारवाई करण्याची गरज आहे. तरच भविष्यात अशा घटनांवर आळा बसेल.
चित्रलेखा पाटील
शेकाप महिला आघाडी प्रमुख

Exit mobile version