| चिपळूण | प्रतिनिधी |
चिपळुणातील एकाची चार आरोपींनी कट रचून, प्रेमाच्या जाळ्यात ओढून व लग्नाचे आमिष दाखवून तब्बल 98 लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. शिवाय यापुढे लग्नाचा हट्ट केलास तर अतिप्रसंगाची पोलिसांत तक्रार करीन, अशी धमकी त्याला दिली. या प्रकरणी चौघांविरोधात चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, तीन महिला व विश्वनाथ अर्जुन नलावडे रा. कळंबोली, ता. पनवेल, मूळ रा. पालवण यांच्याविरोधात गुन्हा दाखलकरण्यात आला आहे. ही घटना दि. 13 सप्टेंबर 2024 पर्यंत सावर्डे परिसरात घडली. या प्रकरणी प्रसाद रमेश पाकळे यांनी सावर्डे पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. सावर्डे पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, तीन महिलांपैकी एकीने प्रमोद पाकळे यांच्याशी जवळीक साधली व त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तसेच सातत्याने लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रूपये घेतले. चारही आरोपींनी संगनमताने कट रचून वेगवेगळ्या कारणांसाठी पैशाची मागणी केली तसेच त्यांनी 98 लाख 18 हजार रूपयांची रक्कम घेतली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाकळे यांनी पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे.