। पेण । प्रतिनिधी ।
पेण तालुक्यातील भोगावती नदीत बुडून वसीम शेख (20) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना परिसरात हळहळ व्यक्त करणारी ठरली आहे. पेण पोलीस ठाण्यात अकस्मित मृत्यु म्हणून नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वसीम शेख हा तरूण आणि त्याचे मित्र नदी किनारी हॉलीबॉल खेळत असताना बॉल नदीपात्रात गेला म्हणून वसीम याने नदी पात्रात उडी मारली. बॉल काढत असताना त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने गुरुवारी (दि.26) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तो नदी पात्रात बुडाला. काही वेळ तो दिसेनासा झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पेण पोलिसांना माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दल आणि हेल्प फाउंडेशन खोपोली पथकांना पाचारण करण्यात आले. पेण पोलीस, अग्निशामक दल आणि हेल्प फाउंडेशन खोपोली यांनी मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, रात्र झाल्याने शोध मोहिम थांबवावी लागली, सकाळी पुन्हा शोध मोहिमेला सुरूवात झाली. साडेतीन तासाच्या अथक प्रयत्ना नंतर शोध मोहिमेला यश आले आणि वसीम शेख याचे मृत देह नदीपात्राच्या आत एका दगडाच्या कपरीत अडकून असल्याचे आढळून आले. मृतदेह नदी पात्रातून काढून शवविच्छेदणासाठी उपजिल्हा रूग्णालय पेण येथे नेण्यात आले. तरूण हा मुळचा उत्तर प्रदेशचा असून, कित्येक वर्ष आपल्या कुटुंबा समवेत सागर सोसायटी पेण येथे वास्तव्याला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांनी नदीत उतरताना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पेण येथील भोगावती नदीत बुडून तरुणाचा मृत्यू
