। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
तालुक्यातील तवसाळच्या समुद्रकिनारी शुक्रवारी एक मृतदेह सापडला असून हा मृतदेह सुनिल गजानन सुर्वे, रा. तवसाळ खुर्द भंडारवाडा यांचा असल्याचे समोर आले. सुनिल सुर्वे बुधवारपासून बेपत्ता होते. या घटनेबाबत पोलीस ठाणे गुहागर येथून मिळालेल्या माहितीनुसार, सुनिल सुर्वे 22 सप्टेंबर रोजी बोटीतून खाडीत पडले होते. नातेवाईकांनी या संबंधीची खबर गुहागर पोलीस ठाण्यात दिली होती. गेले दोन दिवस तवसाळ मधील ग्रामस्थ सुनिल सुर्वे यांचा शोध घेत होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. के. जाधव यांनी घटनास्थळाला भेट दिली. पंचनामा करुन पोलीसांनी सुनिल सुर्वे यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कादवडकर करीत आहेत.