पर्यटनस्थळांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह
। श्रीवर्धन । संदेश घोलप ।
रायगड जिल्ह्यातील निसर्गरम्य आणि पर्यटकांच्या पसंतीस उतरलेल्या दिवेआगर समुद्रकिनारा येथे शनिवारी (दि.21) घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुण्यातील 21 वर्षीय सिद्धार्थ रमेश धिंडळे या तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याने पर्यटनस्थळी सुरक्षेच्या उपाय योजनांबाबत पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ धिंडले हा पुण्यातील हवेली येथील शिवदर्शन चाळ परिसरातील रहिवासी असून, तो आपल्या मित्रांसमवेत सहलीसाठी दिवेआगर येथे आला होता. शनिवारी दुपारच्या सुमारास मित्रमंडळी समुद्रकिनाऱ्यावर फिरत असताना सिद्धार्थने किनाऱ्यालगत असलेल्या गणेश विसर्जनाच्या ठिकाणी पोहण्यासाठी समुद्रात प्रवेश केला. सुरुवातीला सर्व काही सुरळीत होते. मात्र, काही क्षणांतच समुद्रातील लाटांचा वेग अचानक वाढला.
भरतीच्या वाढत्या लाटा आणि ओहोटीच्या तीव्र प्रवाहामुळे सिद्धार्थचा तोल गेला आणि तो खोल पाण्यात ओढला गेला. परिस्थितीची जाणीव होताच मित्रांनी आरडाओरडा करत मदतीसाठी धाव घेतली व स्वतःही शोधकार्य सुरू केले. मात्र, समुद्रातील प्रचंड प्रवाहामुळे त्याला शोधणे अत्यंत कठीण झाले. दरम्यान, सिद्धार्थचा भाऊ रोहन धिंडले व इतर मित्रांनी तात्काळ स्थानिक दिघी सागरी पोलिसांना माहिती दिली. दिघी सागरी पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत शोधमोहीम सुरू केली. या मोहिमेत स्थानिक ग्रामस्थ तसेच इतर स्वयंसेवकांनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला.
काही वेळाच्या अथक प्रयत्नांनंतर भरडखोल येथील म्हात्रे फार्म हाऊस लगत असलेल्या समुद्र किनाऱ्यावर सिद्धार्थ हा बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने बोर्ली पंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक पर्यटक भरतीच्या वेळेत किंवा धोकादायक भागात पोहण्यासाठी जात असल्याचे वारंवार दिसून येते. तसेच, योग्य मार्गदर्शन, चेतावणी फलकांची कमतरता आणि प्रशिक्षित लाइफगार्ड नसल्याने अश्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत.
प्रशासनाने पर्यटकांना समुद्रात उतरताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः भरतीच्या वेळेत समुद्रात जाणे टाळावे, खोल व धोकादायक भागांपासून दूर राहावे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असेही सांगण्यात आले आहे. आवश्यक त्या ठिकाणी लाइफगार्डची नियुक्ती करण्यात यावी. सिद्धार्थच्या आकस्मिक मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, मित्रपरिवार शोकाकुल झाला आहे. एक आनंददायी सहलीचे क्षणात दुःखद घटनेत रूपांतर झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. ही घटना इतर पर्यटकांसाठीही धोक्याची जाणीव करून देणारी ठरत असून, सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.






