| खोपोली | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील प्रसिद्ध ट्रेकिंग स्थळ असलेल्या इर्शाळवाडी येथे रविवारी (दि.10) ट्रेकदरम्यान डोंबिवलीतील 20 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रितेश कोणका असे मृत युवकाचे नाव असून तो मित्रांसोबत ट्रेकिंगसाठी आला होता.
डोंबिवली येथील साहिल सुर्वे (20), युवराज चव्हाण (20), मितेश गुप्ता (20), देवेश गुप्ता (20), क्रिश शेट्टी (20) आणि रितेश कोणका (20) अशी असून, ते इर्शाळवाडी परिसरात ट्रेकिंगसाठी आले होते. इरशाळवाडी परिसरात ट्रेक करत असताना रितेश कोणका याला अचानक अस्वस्थ वाटू लागले. मित्रांनी त्याला सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र काही वेळातच तो बेशुद्ध पडला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले.
ग्रामस्थांच्या मदतीने युवकाला पारंपरिक झोळीच्या साहाय्याने पायथ्याशी आणण्यात आले. त्यानंतर त्याला तातडीने चौक ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले.
प्राथमिक माहितीनुसार उष्माघात किंवा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत असून शवविच्छेदन अहवालानंतर नेमके कारण स्पष्ट होणार आहे. याप्रकरणी सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पीएसआय विशाल पवार यांच्या समन्वयातून पुढील कार्यवाही सुरू आहे. दरम्यान, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर ट्रेकिंगसाठी जाणाऱ्या युवकांनी आवश्यक वैद्यकीय खबरदारी आणि पुरेशा पाण्याची व्यवस्था ठेवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
इर्शाळवाडीत ट्रेकिंगदरम्यान युवकाचा दुर्दैवी मृत्यू
