इन्स्टाग्रामवरील मेसेजमुळे तरुणाचा खून

। पुणे । प्रतिनिधी ।

इन्स्टाग्रामवर केलेल्या मेसेजचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना भवानीनगरमध्ये घडली आहे. आकाश मुशा चौगुले (वय 22, रा. अंथुर्णे, ता. इंदापूर, जि. पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. राजेश उर्फ तात्या सायबु पवार (रा. अंथुर्णे, ता. इंदापूर, जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश पवार आणि राजेश उर्फ तात्या पवार हे दोघे नातेवाईक असून तू माझ्या बहिणीचा फोटो इन्स्टाग्रामवरती मेसेजद्वारे मला का पाठवला, असा जाब विचारण्यासाठी आकाश चौगुले व त्यांची आई शांताबाई चौगुले हे राजेश पवार यांच्याकडे गेले होते. यावेळी राजेश पवार याने त्याच्या हाताने आकाश चौगुले याचा जोरात गळा दाबून त्याला उचलून त्याच्या घरासमोर पडलेल्या दगडावरती जोरात आपटले. आकाश निपचित पडल्याचे पाहून राजेश हा तिथून त्याच्या मोटारसायकलवरून पसार झाला.

घटनेची माहिती मिळताच वालचंदनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजकुमार डुणगे आणि पथकाने त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर वालचंदनगर पोलीस ठाण्याची तीन पथके बारामती तालुका व इंदापूरमध्ये रवाना केली. आरोपी कडबनवाडी गावच्या हद्दीत वनविभागाच्या क्षेत्रात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस आल्याची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.

Exit mobile version