पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला
| पनवेल | प्रतिनिधी |
घरगुती कारणातून एका तरुणीने पनवेल तालुक्यातील माची प्रबळगडाच्या दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पनवेल तालुका पोलिसांनी दुर्गम दरीतून तिचा मृतदेह बाहेर काढला.
पोयंजे बीट येथील पोलिसांना एका महिलेने गडाच्या टोकावरून उडी मारल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक फौजदार मिस्त्री, पोलीस शिपाई जाधव व पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी दाखल झाले. प्रारंभी कोणतीही व्यक्ती दिसून न आल्याने पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने शोधमोहीम राबवली.
दरम्यान, गडाच्या सुमारे 1200 मीटर खोल दरीत एक महिला पडलेल्या अवस्थेत आढळली. अत्यंत दुर्गम, निसरड्या व खडकाळ मार्गामुळे दोरीच्या सहाय्याने खाली उतरून तिला वर आणण्यात आले. तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. मृत तरुणीचे नाव प्रीती सिंग (रा. सेक्टर 12, कोपरखैरणे, नवी मुंबई) असे असून, घरगुती कारणामुळे तिने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.







