| कर्जत | वार्ताहर |
तालुक्यातील ग्रामपंचायत भालिवाडी हद्दीत लाखाचीवाडी येथे एका 20 वर्षीय तरुणीचा प्रसूतीदरम्यान बालकासह मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. माधुरी रोहन मुकणे असे महिलेचे नाव असून, प्रसूतीदरम्यान गंभीर स्थिती निर्माण झाल्याने तिचा आणि तिच्या बालकाचा रविवारी (दि.20) सकाळच्या सुमारास मृत्यू झाला. माधुरी ही आदिवासी कुटुंबातील असून, तिची प्रसूती घरातच करण्यात येत होती, यादरम्यान तिची तब्येत बिघडली. प्रसूती सुरू असतानाच माधुरी बेशुद्ध झाली. घरच्यांनी तातडीने तिला कशेळे येथील रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिला व तिच्या अपत्याला मृत घोषित केले. माधुरीची नियमित तपासणी कडाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू होती, मात्र वेळेत वैद्यकीय मदत न मिळाल्याने माधुरीचा मृत्यू झाल्याचे आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार लालासाहेब तोरवे करत आहेत.