। मुंबई । वृत्तसंस्था ।
मुस्लिम महिलांच्या फोटोंचा लिलाव करणारे एक ऍप्लिकेशन अस्तित्वात असून त्याद्वारे महिलांचा विनयभंग केला जात असल्याचं प्रकरण सध्या चर्चेत आलं आहे. दिल्लीमधील एका महिला पत्रकाराने याबाबत दिल्ली पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं आहे. महिला पत्रकाराचे छेडछाड केलेले फोटो अपलोड केल्याबद्दल या वेबसाइटविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती.
मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने संबधित अॅपच्या संबंधात बेंगळुरू येथील एका 21 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं आहे, असं पोलिसांनी सांगितलंय. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी या संशयिताचे वय वगळता त्याची ओळख अद्याप उघड केलेली नाही. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध आयपीसी आणि आयटी कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ’बुल्ली बाई’ अॅप प्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने बेंगळुरू येथील एका 21 वर्षीय इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे.
मुस्लिम महिलांची बदनामी करणार्या ‘बुलीबाई अॅप’वर दिल्ली आणि मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. समाजमाध्यमांवरील मुस्लिम महिलांची छायाचित्रे ‘बुलीबाई ऑफ द डे’ म्हणून प्रसारित केली जात होती. अशा छायाचित्रांवर दिवसभर आक्षेपार्ह टीका-टिप्पणी करण्यात येत होती. आजवर या अॅप’वर सुमारे 100 मुस्लिम महिलांवर आक्षेपार्ह टिप्पण्या करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी दिल्लीतील एका पीडित महिला पत्रकाराने तक्रार दाखल केल्यानंतर ‘बुलीबाई प’ ब्लॉक करण्यात आले. शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनीही या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता.