रात्री उशिरापर्यंत उघड्या असणाऱ्या हॉटेलांवर प्रश्नचिन्ह
| पेण | प्रतिनिधी |
रिक्षात बसल्याच्या क्षुल्लक कारणावरुन तरुणाला लाथाबुक्क्यांनी, दगड-विटांनी बेदम मारहाण केल्याची घटना पेण तालुक्यातील नंदीमाळ नाक्यावर घडली. यात जमखी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात आरोपी व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील नंदीमाळ नाक्यावरील ॠषिकेश कदम हा तरुण आपल्या दोन मित्रांसोबत मुंबई-गोवा महामार्गावरील सूर्या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला; परंतु हॉटेलमध्ये न जेवता त्याने पार्सल घेऊन जाण्याचे ठरविले. म्हणून त्याचे दोन मित्र निखील आणि अक्षय पार्सल घेण्यासाठी गेले. ॠषी पायाला दुखापत झाली असल्याने हॉटेलच्या बाहेर थांबला. दरम्यान, याठिकाणी रिकाम्या रिक्षामध्ये तो बसला. त्यानंतर अभिजीत हॉटेलमधून बाहेर आला आणि तू आमच्या रिक्षात का बसलास, असे ॠषिकेशला विचारून शिवीगाळ करण्यास सुरूवात केली व रिक्षातून ओढून मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्याचे इतर तीन साथीदार येऊन त्यांनीदेखील मारहाण केली. अभिजीत याने दगड उचलून ॠषिकेशच्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला, मात्र या झटापटीत दगड ॠषिकेशच्या चेहऱ्याला लागून जबर दुखापत झाली. तर इतर तिघांनी लाथाबुक्के, दगड, विटा याने मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला. त्यानंतर बऱ्याच वेळाने आलेल्या अक्षय व निखील या मित्रांनी ॠषिकेशला नंदीमाळ नाका येथे आणले. नंदीमाळ नाका येथील सिद्धेश बाटे याने ॠषिकेशला पोलीस ठाण्यात नेले आणि नंतर पेण येथील सरकारी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, दुखापत एवढी जबर होती की, डॉक्टरांनी त्याला पुढे अलिबागला हलविण्यास सांगितले. परंतु, अलिबागला घेऊन जाईपर्यंत उशीर होईल म्हणून ॠषिकेशला पेण येथील म्हात्रे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेव्हा ॠषिकेशचा चेहरा काळा निळा पडला होता. डोक्याला जबर मारहाण झाली होती. डोळ्यामध्ये रक्त उतरले होते. डॉक्टरांच्या सर्व तपासण्या पूर्ण झाल्यानंतर ॠषिकेशच्या चेहऱ्याला फॅक्चर असल्याचे स्पष्ट झाले.
याबाबत पेण पोलीस ठाण्यात अभिजीत व त्याच्या साथीदारांविरुद्ध भा.दं.वि.स.कलम 326, 324, 323, 504(34) नुसार गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक देवेंद्र पोल यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल योगेश टेंबकर करीत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, यातील आरोपी अभिजीत याच्यावर अनेक वेगवेगळे गुन्हे याअगोदर दाखल आहेत. तीन दिवस उलटून गेले तरी अजून आरोपीला अटक होत नाही. कारण, त्यावर राजकीय लोकप्रतिनिधींचा वरदहस्त असल्याचेदेखील बोलले जात आहे. वारंवार होत असणाऱ्या रात्रीच्या भांडणांना हॉटेल व्यावसायिकही जबाबदार आहेत. रात्री 10 नंतर हॉटेल उघडे ठेवू नये, असे न्यायालयाचे आदेश असतानादेखील मुंबई-गोवा महामार्गावर पेण शहराच्या आजूबाजूला रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू असतात.