दिलीप भोईर समर्थकांकडून तरुणावर हल्ला

रस्त्यात अडवून मारहाण करीत दरोडा टाकण्याचा प्रयत्न

| अलिबाग | प्रतिनिधी |

बँकेत जाणाऱ्या एका तरुणावर दिलीप भोईर समर्थकांनी जीवघेणा हल्ला केला. यामध्ये तो तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ही घटना बुधवारी (दि.10) सकाळी झिराड येथे घडली. त्याच्याकडील सात लाख 58 हजार रुपये व दीड तोळे सोन्याची चेन गायब करण्यात आल्याची माहिती जखमीने दिली. कंपनीत माल टाकण्यावरून हा वाद झाल्याचे त्याने सांगितले. याप्रकरणी परस्पर एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अभिलाष पाटील असे या जखमीचे नाव आहे. हा तरुण गेल्या अनेक वर्षापासून पोल्ट्री व्यवसायिक तसेच बांधकाम व्यवसायिक आहेत. एक महिन्यापूर्वी त्यांनी झिराडपाड्यातील एका कंपनीत बांधकामासाठी माल टाकला होता. त्याचा राग धरून दिलीप भोईर गटाच्या काही मंडळींमध्ये वाद निर्माण झाला होता. बुधवारी सकाळी अभिलाष पाटील चोंढी येथील बँक ऑफ इंडियामध्ये सात लाख 58 हजार रुपयांचा भरणा करण्यासाठी निघाले. त्यावेळी झिराड येथील मुख्य रस्त्यावर पाटील यांना अडवण्यात आले. कंपनीत माल टाकण्याचे काम करायचे असेल, तर दिलीप भोईर तथा छोटमशेटला एक लाख रुपये द्यावे लागतील, नाहीतर तुला काम करून देणार नाही, अशी धमकी दिलीप भोईर यांच्या गटाने दिल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यानंतर विक्रम सांळुखे, सोहेब मुल्ला, अनिकेत शिर्के, मोहम्मद शेख, संतोष सांळुखे व मनिष या सहा जणांनी लाठी, काठ्यांसह लाद्यांनी हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याचेही त्याने सांगितले. झिराडमध्ये दिलीप भोईर यांच्या सांगण्यावरून हा हल्ला झाल्याचा आरोप अभिलाष पाटील यांनी केला आहे. याबाबत त्यांनी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

झिराड परिसरात खासगी बांधकामे सुरू आहेत. ही बांधकामे तब्बल साडेपाचशे कोटी रुपयांची असल्याची चर्चा आहे. ही सर्व बांधकामे दिलीप भोईर यांनी त्यांच्याकडे आणि त्यांच्या समर्थकांकडे वळविली असल्याने स्थानिक तरुणांनी दिलीप भोईर यांच्या धोरणाविरोधात बॅनरबाजी केली. या तरुणांनी एवढ्यावर न थांबता दिलीप भोईर आणि त्यांच्या सोबतच्या समर्थकांच्या गुंड प्रवृत्तीचा पाढा रायगड जिल्हा पोलीस अधीक्षकांसमोर वाचत त्यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती. या सर्व बाबींचा परिणाम झिराड परिसरात झाला. दिलीप भोईर आणि भाजप समर्थक तरुणांनी अभिलाष पाटील याला एकटे गाठून मारहाण केल्याची चर्चा झिराड नाक्यावर रंगली होती.

बँकेत पैसे भरण्यासाठी जात असताना दिलीप भोईरच्या काही मंडळींनी अडवले. काम करायचे असेल, तर दिलीप भोईर यांना एक लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर लाठी-काठ्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. यावरून झिराडमध्ये मनमानी कारभार सुरु असल्याचे स्पष्ट होते.

अभिलाष पाटील, जखमी, झिराड

खासगी कामावरून झिराडमध्ये तरुणावर झालेला हल्ला निंदनीय आहे. याबाबत पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन तेथील गैरप्रकारावर अंकूश ठेवण्याची मागणी केली जाईल. ही हूकूमशाही शेकाप कदापी सहन करणार नाही.

चित्रलेखा पाटील,
शेकाप महिला आघाडी प्रमुख
Exit mobile version