। माणगाव । प्रतिनिधी ।
दिघी मार्गावर निळगुण गावाच्या हद्दीत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मालवाहू ट्रकला भरधाव ॲक्टिवा दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.11) दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास मोर्बा येथून माणगावच्या दिशेने येत असलेली ॲक्टिवा (क्र. एमएच 06 सीबी 8528) निळगुण गावाजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या मालवाहू ट्रकला (क्र. एमएच 46 एफ 4468) पाठीमागून जोरात धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, ॲक्टिवावरील मोहतसिम धनसे (वय 20, रा. मोर्बा) याचा मृत्यू झाला. तर सूफियान बंदरकर (वय 19, रा. मोर्बा) हा गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे दाखल करण्यात आले. त्याची परिस्थिती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
माणगाव-दिघी मार्गावर उभ्या ट्रकला ॲक्टिवाची धडक; तरुणाचा मृत्यू
