दारूच्या नशेत टँकर मागे घेताना अपघात
। चणेरा । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील बारसोली गावाच्या वळणावर टँकर मागे घेत असताना झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.4) रात्री घडली. या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात टँकरचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बारसोली गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वळणावर राजस्थान येथील चालक सोहनलाल कानिया मीना (34) हा टँकर मागे घेत होता. यावेळी त्याने वाहन हयगयीने व निष्काळजीपणे चालविल्याने अपघात झाला. या अपघातात अजय सुभाष सरकार, मूळ पश्चिम बंगाल येथील आणि सध्या धाटाव, ता. रोहा येथे राहणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावर न थांबता अपघाताची माहिती न देता पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. दारूच्या नशेत रस्ता चुकल्याने सदर टँकरचालक बारसोली गावाकडे गेलेला, तेथून मागे फिरताना हा अपघात घडल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार अशुतोष म्हात्रे करीत आहेत.
दारूच्या नशेत आवजड वाहन चालविणे ही केवळ वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली नसून, एखाद्याच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे. या अपघातात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी नशा करून वाहन चालविणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. आपल्यासोबत इतरांचेही जीवन आहे, याचे भान ठेवून जबाबदारीने वाहन चालविणे गरजेचे आहे.
रोहिदास पाशिलकर,
सामाजिक कार्यकर्ते धाटाव
