। सोलापूर । प्रतिनिधी ।
चंद्रभागेत स्नानासाठी गेलेल्या एका 18 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि. 13) सकाळी सहाच्या सुमारास नदीपात्रातील भक्त पुंडलिक मंदिराजवळ घडली. दर्शन नारायण कोलते (रा. न्हावी, ता. यावल, जि. जळगाव) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, एकाला वाचविण्यात स्थानिकांना यश आले.
जळगाव जिल्ह्यातील काही तरुण सलग सुट्ट्यांमुळे श्री विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. रविवारी सकाळी सर्वजण चंद्रभागेत स्नानासाठी उतरले होते. दर्शन कोलते आणि त्याचा आणखी एक मित्र नदीपात्रातील खोल पाण्यात स्नानासाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही बुडाले. स्थानिक लोकांना दोघेजण पाण्यात बुडत असल्याचे दिसले. त्यावेळी एकाला वाचविण्यात यश आले. मात्र, दर्शन कोलते हा तरुण पाण्यात बुडाला. स्थानिकांच्या मदतीने दर्शनचा शोध घेण्यात आला. दरम्यान, दुपारच्या सुमारास दर्शनचा मृतदेह पाण्यात आढळून आला. या घटनेची पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.