| खोपोली | प्रतिनिधी |
सर्वत्र दहीहंडी उत्सवाची धामधुम सुरू असताना अचानक खालापूर तालुक्यातील ग्रामीण बीडखुर्द गावावर शोककळा पसरली असून, या गावातील 18 वर्षीय साहिल दीपक बडेकर या तरुणाचा गावाशेजारील तलावात बुडून मृत्यू झाल्याने सर्वांनी हळहळ व्यक्त केली.
दहीहंडी उत्सव म्हटला की, गाव खेड्यात या उत्सवाची मोठी धामधूम असते. गाव खेड्यातील तरुण घरोघरी जात रिंगण धरत गोपाळकाला उत्सवाचा आनंद उत्सव साजरा केल्यानंतर गावाशेजारी असणाऱ्या तलाव, विहीर किंवा अन्य ठिकाणी जात पावसामध्ये भिजत मौजमजा करत असतात. मात्र, हीच मौजमजा खालापूर तालुक्यातील बीडखुर्द गावातील तरुणावर बेतली असून, त्याचा तलावामध्ये बुडून मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, बीडखुर्द गावातील साहिल दीपक बडेकर हा तरुण मित्रांसोबत गावाशेजारी असणाऱ्या तलावात पोहण्यासाठी गेला असता तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. याबाबतची माहिती समजतात ग्रामस्थांनी तलावाकडे धाव घेतली असता साहिलला बाहेर काढले, मात्र तो त्यावेळी अस्तवस्थ असल्याने त्याला खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्यानंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. साहिलच्या निधनाची माहिती समजताच बीडखुर्द गावासह संपूर्ण खालापूर तालुक्यात शोककळा पसरली आहे.
तलावात बुडून तरुणाचा मृत्यू
