। लातूर । वृत्तसंस्था ।
राज्यात मान्सुनचे आगमन झाले असून विविध जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला. लातूरमध्येही वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. त्यावेळी, लातूरमध्ये राष्ट्रीय महामार्गावरचा दिशादर्शक नाम फलक पडून एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.
मुंबईतील घाटकोपर येथे गेल्या काही दिवसांपूर्वी होर्डिंग्ज कोसळून 17 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच लातूर जिल्ह्यात काहीशी अशीच घटना घडली आहे. लातूर जिल्ह्यातील आष्टा येथील रहिवासी ज्ञानेश्वर बालाजी साके हा तरुण दुचाकीने राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना दिशादर्शक फलक वादळी वाऱ्यामुळे अंगावर पडून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, या घटनेत इतर दोन गाड्यांचेही नुकसान झाले आहे.