खंडाळा घाटात झाडाची फांदी अंगावर पडून युवकाचा मृत्यू

। खोपोली । प्रतिनिधी ।

मुसळधार पावसामुळे खंडाळा घाटात रस्त्याच्या मधोमध मोठे झाड कोसळून वाहतूक विस्कळीत झाली होती. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी झाड हटविण्याचे मदतकार्य सुरू असताना शिळफाटा (खोपोली) येथील रहिवासी अमन मुजावर यांच्या अंगावर झाडाची मोठी फांदी कोसळल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे खोपोली परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमन मुजावर हे इतर नागरिकांसह रस्त्यावर पडलेले झाड हटविण्याचे काम करत होते. त्याचवेळी झाडाची मोठी फांदी अचानक त्यांच्या अंगावर कोसळली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अमन मुजावर हे समाजाभिमुख, सेवाभावी आणि संकटाच्या काळात मदतीसाठी तत्पर धावून जाणारे युवक म्हणून परिसरात परिचित होते. इतरांच्या सुरक्षिततेसाठी मदतकार्य करत असतानाच त्यांचा झालेला मृत्यू अत्यंत वेदनादायी असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version