माणगाव लोणेरे येथे घटना
। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव तालुक्यातील गोरेगाव हद्दीत लोणेरे फाटा येथे पन्हळघर रस्त्यावर एका २२ वर्षीय तरुणाला विजेचा शॉक लागून त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदरची घटना मंगळवार दि.६ डिसेंबर २०२२ रोजी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास घडला. या घटनेची खबर शेखर शिवाजी टेंबे (वय-२४) रा.लक्ष्मी नगर, लोणेरे फाटा, पन्हळघर रोड ता.माणगाव यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर घटनेबाबत गोरेगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, घटनेतील मयत साहिल शिवाजी टेंबे (वय-२२) रा.लक्ष्मी नगर, लोणेरे फाटा, पन्हळघर रोड हा मित्राच्या घरी जेवण करून त्याचा भाऊ व मित्र यांच्या सोबत घरी येत असताना नारायण उमाजी भात्रे यांचे चालू असलेले घराचे बांधकाम जवळ पाण्याच्या पंपाकरिता आणलेल्या चालू लाईटच्या वायरचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती समजताच गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एस.नावले यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेची नोंद गोरेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजि.नं.२२/२०२२ सीआरपीसी १७४ प्रमाणे दाखल करण्यात आले आहे.या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एस.नावले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस.डी.शिंदे हे करीत आहेत.