। दिघी । प्रतिनिधी ।
श्रीवर्धन तालुक्यातील कुडगाव येथील 30 वर्षीय भावेश नरेंद्र पोवळे यांचा बँक ऑफ महाराष्ट्रच्या दिघी शाखेतील एटीएममध्ये पैसे काढताना विद्युत धक्क्याने मृत्यू झाला. शुक्रवारी (दि. 08) सायंकाळी घडलेल्या या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास भावेश दिघीतील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या एटीएममध्ये गेला. सुमारे पावणे सातच्या सुमारास एटीएमचा दरवाजा उघडताच त्यांना जोरदार विद्युत प्रवाह बसला. ते जागीच कोसळले. स्थानिकांनी तात्काळ त्यांना दिघी व नंतर बोर्लीपंचतन येथील खासगी रुग्णालयात हलवले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या घटनेनंतर गावात तसेच तालुक्यात शोककळा पसरली आहे. निष्काळजीपणामुळे अपघात घडल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, एटीएम व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. विद्युत अपघातांमध्ये मृत व्यक्तीच्या वारसांना मदत मिळण्याची अपेक्षा आहे. पोवळे कुटुंबातील आई भावाचा एक आधार हरपला आहे. त्यामुळे मदतीची मागणी केली जात आहे.







