थळ येथील स्विमिंग पूलमध्ये शॉक लागून तरुणाचा मृत्यू

। अलिबाग । प्रतिनिधी ।

तालुक्यातील थळ येथील बीच वॉक रिसॉर्टमधील स्विमिंग पूलमध्ये शॉक लागून श्रीनिवास म्हात्रे (42) रा. किहीम, ता. अलिबाग यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. श्रीनिवास म्हात्रे हे रविवारी (दि. 7) गणरायाच्या विसर्जनानंतर आपल्या नातेवाईकांसह मौजमजा करण्यासाठी थळ येथील बीच वॉक रिसॉर्टमध्ये गेले होते. सद्यस्थितीत हे रिसॉर्ट विनोद गुप्ता या व्यक्तीने भाड्याने घेतले आहे. मात्र, आनंदाचे क्षण दुर्दैवात बदलले. स्विमिंग पूलमध्ये पोहत असताना श्रीनिवास यांना विद्युत प्रवाहाचा धक्का बसला. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद अलिबाग पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भुंडेरे अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version