। रसायनी । प्रतिनिधी ।
रसायनी पोलीस ठाणे हद्दीत भरधाव टँकरने तरुणाला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुनिल कुमार मांझी (29) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेची रसायनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रसायनी पोलीस ठाणे हद्दीत सुनिल कुमार मांझी व सोबत कामगार विनीत कुमार हे बोरिवली येथील मित्सू केम प्लास्ट लिमीटेड कंपनीतील काम संपल्यावर कंपनीचे गेटवरून तळवली वे वाशिवली असे जाणारे रोडने पायी चालत वाशिवली गावात घर सामान आणणेकरीता जात होते. सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एक सफेद-निळ्या रंगाचा टँकरने भरधाव वेगात सुनिल कुमार मांझी यास मागील बाजूने जोरदार धडक दिली. या धडकेत सुनील गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर टँकर चालक पळून गेला आहे. याबाबत संजय पुना मांझी यांनी रसायनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा पाटील अधिक तपास करीत आहेत.







