। मुंबई । प्रतिनिधी ।
बोरीवली पश्चिम येथे भीषण अपघाताची घटना घडली आहे. टेम्पोने रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात 25 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. घटनेनंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून पळून गेला. याप्रकरणी बोरीवलीतील एम.एच.बी. कॉलनी पोलिसांनी अज्ञात टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुनील विश्वकर्मा (रा. नालासोपारा पूर्व) असे मृत तरूणाचे नाव आहे.
सुनील व त्याचे वडील राजेंद्र विश्वकर्मा हे दोघेही 13 मार्च रोजी सकाळी दोघेही बोरीवली पश्चिममधील न्यू लिंकरोड येथील योगीनगर परिसरात कामानिमित्त आले होते. काम आटोपल्यानंतर रात्री नऊच्या सुमारास ते घरी जाण्यासाठी शेअरिंग रिक्षाने जात होते. काही अंतरावर रिक्षाला एका टेम्पोने जोरदार धडक दिली. यात सुनीलच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. मात्र, या अपघातानंतर टेम्पो चालकाने तेथे न थांबता पळ काढला. त्यानंतर सुनीलला उपचारासाठी अॅपेक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, सुनीलच्या प्रकृतीत सुधार न झाल्यामुळे अखेर 15 मार्चला परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान गुरूवारी (दि. 20) सुनीलचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुनीलचे वडील राजेंद्र विश्वकर्मा यांनी एम.एच.बी. कॉलनी पोलीस ठाण्यात टेम्पोचालकाविरोधात तक्रार केली असून पोलीस परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध घेत आहेत.