मुंबई-पुणे महामार्गावर तरूणाचा मृत्यू

| पनवेल | प्रतिनिधी |

भटक्या कुत्र्यामुळे एका 20 वर्षीय तरूणाचा अपघाती मृत्यू झाला आहे. जुन्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पनवेलजवळ वारवई गावाजवळ हा भीषण अपघात झाला. यामध्ये वरळीतील कुशल मनोज सोनकर याचा मृत्यू झाला. कुशल अचानक रस्त्यावरून येणाऱ्या भटक्या कुत्र्यापासून वाचण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि भीषण अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, वरळीतील गोपाळनगर येथे राहणारा कुशल 7 मित्रांसह लोणावळ्याला फिरायला निघाला होता. यामध्ये पाच जण वरळीचे तर दोन जण डोंबिवलीचे होते. लोणावळ्याला जाण्याआधी पनवेलजवळील कळंबोलीमध्ये सर्वजण एकत्र जमले. सकाळी सात वाजताच्या सुमारास सर्वजण लोणावळ्याकडे निघाले होते. कुशल अतिशय वेगात दुचाकी चालवत होता. त्याचवेळी वारवई गावाजवळ अचानक कुत्रा समोर आला. कुत्र्यापासून वाचण्यासाठी कुशने अचानक ब्रेक लावला अन् दुचाकी जोरात घसरली आणि रस्त्याच्या कडेला जाऊन जोरात आदळली.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मित्रांचे जबाब नोंदवले. कुशलच्या चुलत भावाने पोलिसांना सांगितले की, ‘कुत्रा आढवा आल्यानंतर दुचाकी जोरात घसरली त्यावेळी कुशलने नियंत्रण मिळवायचा प्रयत्न केला. पण वेग खूप होता त्यामुळे दुचाकी जोरात घसरली. ‘ या अपघातामध्ये कुशलच्या डोक्याला आणि अंगाला गंभीर दुखापती झाल्या. त्याला जवळच्या रूग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पनवेल पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

    

Exit mobile version