चिल्हर नदीत तरुणाचा बुडून मृत्यू

| नेरळ| प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील चिल्हर नदीमध्ये दारूच्या नशेत पोहण्यासाठी गेलेल्या पाच तरुणांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. हि घटना नेमकी अपघात आहे कि घातपात याचा तपास कर्जत पोलीस करीत आहेत. पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव यशवंत दुंदा हेले असे आहे. तो तरुण साळोख ग्रामपंचायत मधील खोंडेवाडीत राहणारा आहे.


कशेळे येथून वाहणाऱ्या चिल्ह्यार नदीत पाथरज ग्रामपंचायत हद्दीतील खोंडेवाडी येथील राहणारा यशवंत हेले हा मोलमजुरी करणारा तरुण भाताची मळणी करण्यासाठी गेला होता. शेतकऱ्याच्या शेतातील भात झोडणीसाठी त्याच्या सोबत पत्नीच्या माहेरच्या गावातील कशेळे दोरेवाडी येथील जिवलग चार मित्र देखील एकत्र होते. शेतातील भात झोडणीचे काम पूर्ण झाले म्हणून दुपारी यशवंत व त्याचे मित्र असे एकूण पाच जण गावाला लागून वाहणाऱ्या चिल्हार नदीवर पार्टी करण्यासाठी म्हणून बसले होते. सोबत आणलेली दारू पिऊन ते सर्वजण नदीच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले. दारूच्या नशेत शुद्ध हरवून बसलेले यशवंत व त्याचे मित्र काहीवेळ पाण्यात मौजमजा करीत राहिले. पोहणे पूर्ण झाल्यावर यशवंत हेलेचे चार मित्र नदी बाहेर येऊन आपआपल्या घरी गेले. घरी गेल्यावर मित्रांपैकी एका मित्राला आठवण झाली आणि त्यानंतर यशवंत आपल्या सोबत पाण्याबाहेर आलाच नाही याची आठवण झाली.

त्यानंतर ते चौघे पुन्हा यशवंतला शोधण्यासाठी नदीवर पोहचले होते. मात्र अंधार झाल्याने यशवंत नदीच्या पात्रात दिसून आला नाही. गावातील ग्रामस्थ देखील त्याला शोधण्यासाठी नदीवर पोहचले होते. यशवंत काही आढळून आला नाही. स्थानिक ग्रामस्थांनी यशवंत हरवला असल्याची तक्रार कर्जत पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या कशेळे आऊट पोस्ट पोलीस ठाण्यात दिली. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पोलीसांनी जावून यशवंतचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दि.11 रोजी सकाळी पुन्हा एकदा कर्जत पोलिसांनी तपास सुरू केला. त्यावेळी स्थानिक ग्रामस्थांना यशवंत हेले याचा मृतदेह पाण्यात दिसून आला. पाण्यात बुडालेल्या ठिकाणाहून काही अंतरावर मृतदेह पाण्यात सापडला होता. ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी यशवंतचा मृतदेह पाण्याबाहेर काढून मृतदेह कशेळे येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेला.

दरम्यान, ज्या ठिकाणी ते सर्व तरुण पोहण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी नदी पात्रात पाण्याचा साठा कमी होता. यशवंत हा पट्टीचा पोहणारा असल्याचे ग्रामस्थ सांगत असून चांगला तरुण पाण्यात बुडतो कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यशवंतच्या मृत्यूबद्दल ग्रामस्थांनी आणि त्याच्या नातेवाईक यांनी संशय व्यक्त केला असून कर्जत पोलिसांनी यशवंत सोबत नदीवर पोहायला गेलेल्या चार मित्रांना ताब्यात घेतले आहे. कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली कशेळे पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी थोरणे आणि राठोड हे तपास करीत आहेत.

Exit mobile version