गावात राबवले स्वच्छता अभियान
| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायत हद्दीतील लोभेवाडी आदिवासी वाडीतील तरुणांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. सुट्टी म्हटली की मैदानावर किंवा मोकळ्या जागेत तरुण मुले क्रिकेट खेळताना आपल्याला दिसतात. मात्र लोभेवाडी तरुणांनी या शुक्रवारी हातात क्रिकेटची बॅट न घेता झाडू हातात घेत पूर्ण गावाचा परिसर स्वच्छ करून ग्रामस्थांच्या आरोग्याला प्राधान्या दिले. त्यांच्या या कार्याचे आजूबाजूच्या गावातील मंडळींही कौतुक करत आहेत.
गावातील रस्ते, मोकळ्या जागेत गवत वाढले होते. कुठे रस्त्याच्या कडेलाच कचरा मोठ्या प्रमाणात साचला होता. या गोष्टींकडे दुर्लक्ष झाले असले तरी आता लोभेवाडी गावातील तरुणांनी एकत्र येत गाव स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला. आपले गाव ही आपलीच जबाबदारी ही संकल्पना राबविण्याचे त्यांनी पक्के केले आणि तरुणांना गावाचा एक ग्रुप तयार केला. त्यातून तरुणांना गावात स्वच्छता अभियान राबविण्याची माहिती देण्यात आली. त्यानुसार शुक्रवारी (दि.20) गावातील 30 ते 40 तरूण एकत्र येत गावातील सर्व परिसर स्वच्छ केला.
लोभेवाडी गावात जाणारा मुख्य रस्ता झाडूने स्वच्छ करून गावातील गली बोळात जाऊन साफ सफाई केली. गावात अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याची शक्यता असते, त्यामुळे ही एक दिवस गावाच्या स्वच्छतेसाठी देण्यासाठी नव तरुण मित्र मंडळांनी निर्णय घेतला होता.







