सरसगडावरून घसरून तरुण जखमी

। सुधागड-पाली । वार्ताहर ।
पालीतील सरसगड किल्ल्याच्या पायर्‍यांवरून घसरून रविवारी (ता.21) दुपारी तीनच्या सुमारास एक तरुण खाली पडला. त्याचा डावा हात फॅक्चर झाला असून, खांदा व कमरेला मुका मार लागला आहे. स्थानिक तरुणांच्या प्रयत्नांनी व रेस्क्यू टीमच्या मदतीने या तरुणाला पालीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. तसेच रात्री नऊच्या सुमारास मुंबई येथे पुढील उपचारासाठी नेण्यात आले.

मुकुल जोशी (रा.मुलुंड) असे या तरुणाचे नाव आहे. तो चक्रम हायकर्स टीमचा सदस्य आहे. सरसगड किल्ल्याच्या पायर्‍या निसरड्या झाल्या असल्याने मुकुल हा वरच्या पायरीवरून थेट पाय घसरून खाली कोसळून जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक तरुण अमित निंबाळकर, प्रदीप (दादू) गोळे, ज्ञानेश्‍वर जगताप, दर्शन तळेकर, रोहन राऊत, संकेत राऊत, सुमित राऊत अभिजीत वरंडे, व विवेक गुंड यांनी या तरुणाला स्ट्रेचरवरून खाली आणले. खोपोली येथील रेस्क्यू टीमने देखील सहाय्य केले.

Exit mobile version